शुबमन गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार; देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी ठरली निवडीचा निकष
टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होताच क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. संघ निवडीत काही धक्कादायक आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. शुबमन गिलला (Shubhamn Gill) संघाबाहेर ठेवण्यात आलं असून अक्षर पटेलला संधी देत त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय रिंकु सिंह (Rinku Singh) आणि इशान किशन (Ishan Kisan) यांची टीम इंडियात पुनरागमन झाली आहे.
इशान किशनच्या निवडीमागे त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरी कारणीभूत ठरली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayyed Mushtaq Ali) 2025 मध्ये इशानने झारखंड संघाचं नेतृत्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्याची आक्रमक फलंदाजी आणि सातत्यपूर्ण कामगिरी संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा विषय ठरली होती. वर्ल्डकप भारतात होत असल्याने आणि इशान सध्या उत्तम फॉर्ममध्ये असल्याने त्याची निवड संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास निवडकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या स्पर्धेत इशान किशनने 57 च्या सरासरीने आणि तब्बल 193 च्या स्ट्राईक रेटने 516 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून दोन शतकं आणि दोन अर्धशतकं निघाली. या कामगिरीकडे दुर्लक्ष करणं निवड समितीला शक्य नव्हतं आणि अखेर त्याला वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आलं.
भारतीय संघात संजू सॅमसन (Sanju Samson) आणि इशान किशन हे दोन विकेटकीपर-फलंदाज असतील. प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, जर संजूला दुखापत झाली किंवा विश्रांती देण्यात आली, तर त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने अभिषेक शर्मासोबत (Abhishekh Sharma) डावाची सुरुवात करत संघाला भक्कम पाया घालून दिला होता.
इशान किशनचं हे कमबॅक विशेष मानलं जात आहे कारण जवळपास दोन वर्षांनंतर त्याला पुन्हा टीम इंडियाची जर्सी घालण्याची संधी मिळाली आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना 28 नोव्हेंबर 2023 रोजी गुवाहाटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तर शेवटचा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये तो जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा खेळला होता.
दक्षिण आफ्रिका (South Africa) दौरा अर्धवट सोडून परतल्यामुळे इशानचा संघातील प्रवास खडतर झाला होता. मात्र, त्यानंतर सलग दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेत त्याने स्वतःला पुन्हा सिद्ध केलं. अखेर त्या कष्टांचं फळ मिळालं असून, टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात त्याची निवड झाली आहे.




