अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण सध्या चांगलेच ढवळून निघाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात १७ वेळा दूरध्वनीवर संवाद झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
मात्र, या दाव्यानंतर दमानिया यांच्याकडे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) कसा पोहोचला, याबाबत विविध स्तरांवरून प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यामुळे या संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया निर्माण झाली आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी एसआयटीचा तपास मंद गतीने सुरू असल्याचा आरोप करत, गरज भासल्यास चौकशी सीआयडीकडे सोपवावी, अशी मागणी केली.
अंधारे यांनी आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास का केला जात नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच, जर बाहेरील व्यक्तींना CDR मिळू शकतो, तर तपास यंत्रणेला ते मिळवण्यात अडचण का येते, असेही त्यांनी विचारले.
तपासात तातडीने गती आणली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर, अशोक खरात प्रकरणात पुढील काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




