यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण मंगळवार, 17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणार आहे. हे एक ‘कंकणाकृती’ सूर्यग्रहण असेल. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला अत्यंत संवेदनशील काळ मानले जाते. विशेषतः हे ग्रहण कुंभ राशीत आणि शनीच्या प्रभावाखाली होत असल्याने, त्याचा मानवी जीवनावर सूक्ष्म पण खोल परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ग्रहण दुपारी 3:26 वाजता सुरु होईल, तर संध्याकाळी 7:57 वाजता संपेल. हे ग्रहण अंटार्क्टिका, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या भागात दिसेल. भारतात हे ग्रहण थेट दिसणार नसले तरी, ज्योतिषीय दृष्टिकोनातून त्याचा प्रभाव राशीचक्रावर नक्कीच जाणवेल.
अन्न ग्रहण करणे टाळा: धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात अन्नावर किरणांचा नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे ग्रहण सुरू असताना जेवण करणे किंवा पाणी पिणे टाळावे. ग्रहणाच्या काळात नवीन कार्याची सुरुवात करू नका. तसेच कोणतीही नवीन कामे, महत्त्वाचे करार किंवा मोठी गुंतवणूक करणे अशुभ मानले जाते. या काळात घेतलेले निर्णय भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी लागेल. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या टोकदार वस्तूंचा वापर करू नये, अशी पूर्वापार चालत आलेली श्रद्धा आहे. सूर्यग्रहण काळात झोपल्याने शरीरात आळस वाढतो आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. या वेळेत नामस्मरण किंवा ध्यान करणे अधिक फलदायी मानले जाते.




