आदित्य ठाकरेंचा शिवसेनेसाठी आग्रह, तर पवारांच्या उमेदवारीसाठी सुळेंचे काँग्रेस श्रेष्ठींना साकडे; मविआच्या बैठकीकडे लक्ष
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी रणधुमाळी सुरू झाली असून, विधानसभेतील संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीचे ६ उमेदवार सहज निवडून येतील, असे चित्र स्पष्ट आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवरून महाविकास आघाडीत खलबतं रंगली आहेत. शिवसेना (UBT) कडे सर्वाधिक २० आमदार असल्याने या जागेवर आमचा हक्क असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठामपणे मांडले आहे. असे असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत असल्याने पेच निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार नुकतेच रुग्णालयातून घरी परतले असून त्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू आहे. सुळे म्हणाल्या की, “शरद पवार यांनी राज्यसभेवर जावे अशी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची आणि आमदारांची इच्छा आहे. यासाठी आम्ही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी संवाद साधला असून, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीही मी दिल्लीत भेट घेणार आहे.” महाविकास आघाडीने एकमताने निर्णय घ्यावा आणि शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करावे, अशी विनंती त्यांनी घटक पक्षांना केली आहे.
महाविकास आघाडीत सध्या शिवसेनेचे २०, काँग्रेसचे १६ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार आहेत. अपक्षांच्या मदतीने ही एक जागा जिंकणे मविआसाठी कठीण नाही, मात्र उमेदवारी कोणाला मिळणार हे कळीचा मुद्दा ठरला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहू शकले नव्हते, त्यामुळे आज होणारी महाविकास आघाडीची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत शिवसेनेचा दावा कायम राहणार की शरद पवारांच्या नावावर सर्वसहमती होणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.




