राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रचं राजकारण पुन्हा एकदा पवार कुटुंबाभोवती फिरू लागले आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रश्न उपस्थित केलेत की, पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेलं असताना विलिनीकरणाची चर्चा त्याच प्रांगणात कोणी कशासाठी केली? विलिनीकरणाची चर्चा अंत्यसंस्कार होण्यापूर्वी ज्या पद्धतीने मुलाखती देण्यात आल्या त्याची घाई कशासाठी होती? तर विलिनीकरण कोणी कोणाबरोबर चर्चा केली या विषयावर अधिक काही भाष्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. यावेळी तटकरे यांनी अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या विविध मुद्यांवर भाष्य केले.
आधी विलिनीकरणाची चर्चा करणे म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी दुसऱ्या कोणाला बसवायचं होतं का? आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून स्वतंत्रपणे निवडून आलो आहोत, असे तटकरे म्हणाले. पुढे तटकरे शपथविधीच्या वेळेवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना म्हणाले, तीन दिवसाचे विधी झाल्यानंतर शपथविधी झाला म्हणजे 72 तासानंतर. त्यामुळे तातडीने शपथविधी असं म्हणण्याचं काही कारण येतच नाही. त्यांनी पुढे सांगितले की, शासकीय दुखवटा पाळल्यानंतर आम्ही विधिमंडळ पक्षाची बैठक चौथ्या दिवशी बोलवली आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी राज्यपाल महोदयांना विनंती करून शपथ दिली. अजित पवारांच्या NDA सोबत जाण्याच्या भूमिकेबद्दल ते म्हणाले की, 2019 मध्ये दादांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकार बनवावं. मी आजही वारंवार स्पष्ट केलं आहे की आम्ही NDA मध्ये आहोत. आमची पुढची वाटचाल NDA ध्येच राहणार आहे, हे मी दादा हयात असतानाही वारंवार सांगितले आहे. पुढील राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? यावर ते म्हणाले की, आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या मनातल्या ज्या संवेदना आणि भावना आहेत, त्या मनामध्ये ठेवतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या संदर्भातला निर्णय घेईल.
पुढे ते म्हणाले, या निवडणुका एकत्रितपणाने लढवाव्यात आणि घड्याळाच्या चिन्हावरती लढवाव्यात अशी चर्चा त्या बैठकीमध्ये झाली असं दादांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं. दादांनी त्यांना फोन करून सूचना दिली होती की, ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती उमेदवार उभे करा, अशा सूचना आपल्या जिल्हाध्यक्षांना द्या. तटकरेंनी आपल्या राजकीय प्रवासाबाबत सांगितले की, मी गेली 40 वर्षे राजकारणामध्ये आणि 99 सालापासून दादांचा एक सहकारी म्हणून वावरत आलो, जो निर्णय दादा करतील, त्या निर्णयाचं मी शेवटपर्यंत पालन करत आलो आहे.
दिवंगत अजित पवारांच्या अपघाताबाबत त्यांनी मागणी केली की, या घटनेची सखोल चौकशी व्हावी असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाला आधीच सांगितल आहे. उच्चस्तरीय चौकशी करून ते सत्य महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेसमोर लवकरात लवकर यावं हीच इच्छा आहे. पार्थ पवारांच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, दादांनीच सूचना केली होती की याची उच्चस्तरीय समितीने चौकशी करावी. आता उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल राज्य सरकारकडे आला आहे. या विषयावर अधिक बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.




