बारामतीत ‘बिनविरोध’साठी शरद पवारांनाही उपस्थित राहण्याचे तटकरेंचे आवाहन!
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता नाट्यमय वळण पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी उद्या सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, ही निवडणूक संघर्षापेक्षा सामंजस्याने व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कंबर कसली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क साधला असून, खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही उद्या अर्ज भरताना उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना केली जाणार असल्याचा खळबळजनक दावा तटकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सकारात्मकता दर्शवली असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, बारामतीमधील सभेत तरुण नेते जय पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अजित दादांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या विमान अपघाताच्या चौकशीवरून जय पवार आक्रमक झाले असून, व्हीएसआर कंपनीचा मालक विजय कुमार सिंग याला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या मागणीला सुनील तटकरे यांनी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. “जय पवारांची मागणी हीच राष्ट्रवादीची भूमिका असून, या अपघाताबाबत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या शंकांचा समावेश करून शीघ्र गतीने तपास व्हावा आणि अंतिम अहवाल जनतेसमोर यावा,” अशी आग्रही मागणी तटकरे यांनी केली आहे.
पक्षाला वारंवार टार्गेट का केले जाते, या जय पवारांच्या प्रश्नावर बोलताना तटकरे यांनी त्यांच्या भावनांचे समर्थन केले. जय पवार हे तरुण नेतृत्व असून कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद त्यांनी मांडली आहे, जी संघटनेसाठी योग्यच असल्याचे ते म्हणाले. संसदेत गेल्यानंतर आजही देशभरातील खासदार अजित दादांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त करत असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. बारामतीचा हा भावनिक वारसा आणि राजकीय पेच पाहता, उद्याचा दिवस बारामतीच्या राजकारणात अत्यंत निर्णायक ठरणार आहे.




