रुपाली चाकणकर यांच्याभोवतीचा वाद दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून त्याचे पडसाद आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटू लागले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता त्यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही दूर करण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येत आहेत. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही नेत्यांनी त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली असताना, दुसरीकडे काही वरिष्ठ नेते त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षातील आमदार आणि नेत्यांमध्ये स्पष्ट दोन गट पडल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, चाकणकर यांनी पक्षाच्या विचारसरणीविरोधात काम केल्याचा आरोप करत त्यांना केवळ पदावरून नव्हे तर पक्षातूनच बाहेर काढावे, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागण्यांमागे पक्षातील वरिष्ठ स्तरावरील राजकीय समीकरणेही कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, पक्षातील महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असून, महिला कार्यकर्त्यांमधील असंतोष त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत. चाकणकर प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. तसेच, पक्षात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ठोस भूमिका घेण्याचीही मागणी होणार असल्याचे समजते.




