बाल्कनीत फुलवा सूर्यफुलांचा बहर! कंटेनर गार्डनिंगमध्ये वाढतोय नवा ट्रेंड
शहरांमध्ये मोकळी जागा कमी होत असली तरी गार्डनिंगची आवड मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच आता कंटेनर गार्डनिंग म्हणजेच कुंड्यांमध्ये झाडं लावण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतोय. बाल्कनी, टेरेस किंवा खिडकीजवळच्या छोट्या जागेतही लोक फुले, भाज्या आणि काही फळझाडं यशस्वीरित्या वाढवत आहेत. अशाच फुलांमध्ये सूर्यफूल हे सौंदर्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तेजस्वी पिवळ्या रंगामुळे घराचा कोपरा देखील उजळून निघतो.
सूर्यफूल कमी जागेत चांगल्या प्रकारे वाढू शकतं, मात्र त्यासाठी योग्य पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे. या रोपाला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो, पण जास्त पाणी किंवा चुकीची माती यामुळे त्याची वाढ खुंटू शकते. त्यामुळे योग्य वेळ, मातीची निवड आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं.
तज्ज्ञांच्या मते, सूर्यफूल लावण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च हा काळ सर्वात योग्य मानला जातो. या काळात तापमान साधारण 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असतं, जे बियांच्या उगवणीसाठी पोषक असतं. खूप थंड वातावरणात बियाणं खराब होण्याचा धोका असतो, तर सतत पावसामुळे मुळे कुजण्याची शक्यता वाढते.
कुंडीत सूर्यफूल लावायचं असल्यास किमान 12 ते 16 इंच खोल कुंडी निवडावी. तळाशी पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणं अत्यंत आवश्यक आहे. माती तयार करताना बागेची माती, कंपोस्ट आणि वाळू किंवा कोकोपीट यांचं योग्य प्रमाणात मिश्रण करावं. बियाणं साधारण एक इंच खोल लावून हलकं पाणी द्यावं.
सूर्यफुलांच्या वाढीसाठी दररोज किमान 6 ते 8 तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सकाळपासून दुपारपर्यंत सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडल्यास रोपं मजबूत वाढतात. कमी प्रकाशात रोप उंच वाढतं, मात्र ते कमजोर राहतं आणि फुलं उशिरा येतात. कुंडी एकाच बाजूला झुकू नये यासाठी वेळोवेळी तिची दिशा बदलणं देखील गरजेचं आहे.
पाणी देताना संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे. वरची माती थोडी कोरडी वाटल्यानंतरच पाणी द्यावं. उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते, तर हिवाळ्यात ती कमी होते. मात्र कुंडीत पाणी साचू देणं धोकादायक ठरू शकतं, कारण त्यामुळे मुळे सडतात. पानांपेक्षा मुळांना थेट पाणी देणं अधिक फायदेशीर ठरतं.
सूर्यफूल वेगाने वाढणारं झाड असल्यामुळे त्याला वेळोवेळी खतांची गरज भासते. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी हलकं सेंद्रिय खत द्यावं. त्यानंतर दर 20 ते 25 दिवसांनी कंपोस्ट, गांडूळखत किंवा कुजलेलं शेण वापरता येतं. फुलांच्या टप्प्यावर फॉस्फरसयुक्त सेंद्रिय खत दिल्यास फुलांची संख्या आणि गुणवत्ता वाढते. रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक पर्याय वापरणं झाडांसाठी अधिक सुरक्षित मानलं जातं.
योग्य काळजी घेतली तर तुमच्या बाल्कनीतही सूर्यफुलांचा सुंदर बहर पाहता येऊ शकतो. कमी जागेतही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कंटेनर गार्डनिंग आणि सूर्यफूल लागवड हा उत्तम पर्याय ठरत आहे.




