Sunetra Pawar Phone Call to Uddhav Thackeray : बारामतीच्या रणांगणात नवा पेच! सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन; बिनविरोधच्या आशेवर काँग्रेसने फेरले पाणी

spot_img

राज्याच्या राजकारणात सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवरून वेगवान घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी चिन्हे होती. मात्र, काँग्रेसने या दोन्ही जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

बारामतीमध्ये दिवंगत अजितदादांच्या जागी आता सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध व्हावी, असा महायुतीचा प्रयत्न होता. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीच्या हिरव्या कंदील मिळताच दंड थोपटले आहेत. काँग्रेसने बारामतीसाठी ६ तर राहुरीसाठी ४ उमेदवारांच्या मुलाखतीही पूर्ण केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, जर राष्ट्रवादी (पवार गट) ही जागा लढवणार नसेल, तर काँग्रेस तिथे आपला झेंडा फडकवण्यास तयार आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत एकवाक्यता आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य मागितले आहे. आता उद्धव ठाकरे काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर काय प्रतिक्रिया देतात आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला आधीच वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्षाने पाठिंबा दर्शवल्याने बारामतीची लढत आता चौरंगी किंवा बहुरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सत्तेसाठी सुरू असलेल्या या संघर्षात ‘बारामतीचा गड’ कोण राखणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ