लाडकी बहीण योजनेतील अडचणींवर भर; अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबार आयोजित केला. या उपक्रमातून त्यांनी नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. विशेषतः महिलांनी मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेशी संबंधित समस्यांकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले.
सकाळी साडेआठच्या सुमारासच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बारामती तालुक्यातील विविध गावांमधून लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. महिलांनी लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक अडचणी, स्थानिक पातळीवरील समस्या तसेच वैयक्तिक तक्रारी मांडल्या. सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, बारामती वकील संघटनेच्या प्रतिनिधींनीही त्यांची भेट घेऊन काही व्यावसायिक मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्याच्या या पद्धतीमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनीही सुनेत्रा पवार यांची भेट घेत स्पर्धेचे निमंत्रण दिले. या प्रसंगी त्यांच्या हस्ते स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली.
यावेळी बोलताना त्यांनी कुस्ती हा महाराष्ट्राच्या परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगत अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना मोठी संधी मिळते, असे मत व्यक्त केले. तसेच राज्यातील कुस्ती परंपरेला सरकारकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.




