उन्हाळ्यातील थंडावा की विष? भेसळयुक्त कलिंगड ओळखण्यासाठी FSSAI च्या खास टिप्स
वाढत्या तापमानामुळे सध्या शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे. यामध्ये ‘कलिंगड’ हे सर्वांचेच आवडते फळ. मात्र, काही नफेखोर व्यापारी कलिंगड लवकर पिकवण्यासाठी आणि ते आतून अधिक लाल दिसण्यासाठी ‘एरिथ्रोसिन’ (Erythrosine) सारख्या घातक रसायनांचे इंजेक्शन देत असल्याचे समोर आले आहे. असे भेसळयुक्त कलिंगड खाल्यास पोटाचे विकार आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
अशी करा घरच्या घरी चाचणी
कलिंगड खरेदी केल्यानंतर किंवा बाजारात असतानाच त्याचा एक छोटा तुकडा कापून घ्या. एक पांढरा कापसाचा गोळा किंवा टिश्यू पेपर घेऊन त्या तुकड्यावर हलकेच घासून पहा. जर तो कापूस किंवा पेपर लाल झाला, तर समजून जा की त्यात कृत्रिम रंगाची भेसळ आहे. नैसर्गिक कलिंगडाचा रंग अशा प्रकारे कापसाला लागत नाही.
इंजेक्शनच्या खुणांकडे दुर्लक्ष करू नका
कलिंगड विकत घेताना त्याच्या सालीचे नीट निरीक्षण करा. जर फळावर लहान छिद्रे दिसत असतील, तर ते इंजेक्शन टोचल्याचे लक्षण असू शकते. तसेच, ज्या कलिंगडावर जास्त पिवळे डाग दिसतात, ते ‘कार्बाइड’ वापरून पिकवलेले असण्याची शक्यता असते. अशी फळे खाण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुणे किंवा शक्यतो टाळणेच हिताचे ठरते. तुमची ही छोटीशी सतर्कता तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला विषबाधेपासून वाचवू शकते.




