‘कबीर सिंह’ आणि ‘ॲनिमल’सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपट ‘स्पिरिट’कडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. प्रभाससारख्या साऊथ सुपरस्टारसोबत हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. मात्र सुरुवातीपासूनच ‘स्पिरिट’ वादांच्या सावटाखाली असल्याचं चित्र दिसत आहे.
या चित्रपटात सुरुवातीला प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत असणार होती. मात्र मानधन वाढवण्याची आणि दिवसाला केवळ 8 तास काम करण्याची अट घातल्यानंतर निर्मात्यांनी ती मागणी नाकारली. परिणामी दीपिकाने चित्रपटातून माघार घेतली आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली.
आता दीपिकानंतर आणखी एका मोठ्या नावाची या चित्रपटातून एक्झिट झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांनी ‘स्पिरिट’ मधेच सोडल्याची माहिती समोर येत आहे. ‘ओटीटी प्ले’च्या वृत्तानुसार, हैदराबादमध्ये सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान प्रकाश राज आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यात मतभेद झाले.
सुरुवातीला हे मतभेद स्क्रिप्ट आणि एका विशिष्ट सीनच्या शूटिंगवरून होते. मात्र पुढे हे मतभेद वाढून सेटवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आणि गंभीर वाद झाला. याशिवाय शूटिंगदरम्यान काही व्यवहार आणि प्रॉडक्शनशी संबंधित अडचणी असल्याचंही बोललं जात आहे. काही गोष्टी प्रॉडक्शन टीमला मान्य नव्हत्या. अखेर या सगळ्या कारणांमुळे प्रकाश राज यांनी चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.
‘स्पिरिट’च्या घोषणावेळी प्रकाश राज यांच्या दमदार आवाजाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या एक्झिटनंतर चित्रपटावर नेमका काय परिणाम होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. याआधीही संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शन शैलीवर टीका झाली आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये अतिरेकी हिंसा दाखवली जाते, असा आरोप काही समीक्षकांनी केला होता.
‘स्पिरिट’ हा चित्रपट 5 मार्च 2027 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत तृप्ती डिमरी आणि विवेक ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता सतत होणाऱ्या बदलांमुळे ‘स्पिरिट’चा प्रवास किती वादग्रस्त ठरणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.




