Sonali Kulkarni : ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली नराधम… अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनीने संताप केला व्यक्त

spot_img

अंधश्रद्धेच्या विळख्यात शोषणाचा खेळ: १० एफआयआर आणि १०० हून अधिक तक्रारींनी महाराष्ट्र हादरला

नाशिकमधील स्वयंघोषित ‘महाराज’ कॅप्टन अशोक खरात याच्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (SIT) युद्धपातळीवर सुरू आहे. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या भोंदूबाबावर आतापर्यंत नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात १० गुन्हे (FIR) दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यातील ८ गुन्हे हे थेट लैंगिक छळाशी संबंधित आहेत. एसआयटीकडे आतापर्यंत फोनद्वारे १०० पेक्षा जास्त पीडितांनी तक्रारी केल्या असून, जप्त करण्यात आलेल्या ५८ ‘रहस्यमय’ व्हिडिओंनी खरातच्या पापाचा घडा भरल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक बड्या हस्ती आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची शक्यता असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

या प्रकरणावर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने लोकांच्या मानसिकतेवर बोट ठेवत विचारले की, “आता तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक आपण समजून घेणार आहोत का?” महिलांवरील अत्याचार, आर्थिक लुटालूट आणि भावनिक शोषणाचा हा प्रकार अत्यंत घृणास्पद असल्याचे तिने नमूद केले. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अंधश्रद्धेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना टोला लगावताना तिने म्हटले की, आपल्या उंबरठ्यावर असलेली ही अस्वच्छता वेळीच साफ करणे गरजेचे आहे, अन्यथा आपण असेच ठगले जाऊ.

सोनालीपूर्वी ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही या प्रकरणावरून समाजाला अंतर्मुख व्हायला लावणारे प्रश्न विचारले होते. एखादा माणूस पकडला गेल्यावरच त्याला ‘भोंदू’ का म्हटले जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भक्तांच्या आंधळ्या विश्वासामुळेच अशा प्रवृत्ती फोफावतात, असे सांगत त्यांनी हे समीकरण केवळ धर्मापुरते मर्यादित नसून राजकारणातही तेवढेच लागू होते का, असा टोकदार सवाल केला आहे. सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, एसआयटीच्या तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ