बॉलिवूडची दमदार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अलीकडे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. जहीर इक्बालसोबत लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच तिने त्यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
सोनाक्षीने सांगितले की, ती आणि जहीर तब्बल तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, पण हा सगळा काळ दोघांनीही नाते सर्वांपासून लपवून ठेवले. इतकेच नाही तर तिच्या आई-वडिलांनाही तिने काहीच सांगितले नव्हते. “मनाची तयारी होईपर्यंत मी कोणालाच सांगितलं नाही,” असे सोनाक्षी म्हणाली.
काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी सिव्हिल मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुरुवातीलाच सोशल मीडियावर सोनाक्षीवर टीकेचा भडिमार झाला होता.
सोनाक्षीने आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला लग्न ठरल्यानंतर जहीरने सुचवलं की आपण दोघं वेगळं राहूया. त्यावर सोनाक्षीने थेट उत्तर दिलं, “तुला राहायचं असेल तर तू बाहेर रहा, मी तर तुझ्या आई-बाबांसोबतच राहणार!” आज सोनाक्षी जहीरच्या कुटुंबासोबतच राहते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायला तिला खूप आवडतं.
नुकतीच ती सासू-सासऱ्यांसोबत बाहेर दिसली. तेव्हा लगेच पापाराझींची गर्दी जमली. मात्र, आपल्या कुटुंबाचा आदर ठेवत सोनाक्षीने फोटो-व्हिडीओ घेऊ नका अशी नम्र विनंती केली “आता नको… आई-पप्पा आहेत… थोडं समजून घ्या,” असं म्हणताना ती कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. तिच्या लूकची, तसेच सासऱ्यांसोबतच्या बॉन्डिंगचीही चर्चा रंगली आहे.
सलमान खान आणि जहीरच्या वडिलांची चांगली मैत्री असून, जहीरला अभिनयात संधीही सलमाननेच दिली होती. सोनाक्षीचे सासरे हे मोठे व्यापारी आहेत आणि कुटुंबातील या बंधामुळे चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे.




