spot_img

Solo Dating :  Gen Z मध्ये नवा ट्रेंड ‘सोलो डेटिंग’ ची वाढतेय क्रेझ

spot_img

स्वतःसोबत वेळ घालवण्याचा नवा फंडा; आत्मओळख, स्वावलंबन आणि मानसिक शांततेवर भर

Gen Z च्या काळात डेटिंग म्हणजे केवळ पार्टनरसोबत बाहेर जाणं एवढ्यावर मर्यादित राहिलेलं नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड चर्चेत आहे आणि तो म्हणजे एकट्याने डेटवर जाणं. या नव्या संकल्पनेला ‘सोलो डेटिंग’ (Solo Dating) किंवा ‘मास्टरडेटिंग’ असं म्हटलं जात आहे. ऐकायला जरी वेगळं वाटलं, तरी अनेक तरुण हा अनुभव आवर्जून घेत आहेत.

सोलो डेटिंगमध्ये व्यक्ती स्वतःसोबत वेळ घालवते. कोणतीही अपेक्षा, बंधन किंवा दबाव न ठेवता स्वतःला समजून घेण्याचा हा एक मार्ग मानला जातो. कपल्स डेटिंगचा आनंद घेत असतानाच, अनेक सिंगल तरुण स्वतःच्या सोबतच डेट एन्जॉय करत आहेत. या डेटमध्ये एकट्याने फिरायला जाणं, शॉपिंग करणं, आवडत्या ठिकाणी वेळ घालवणं किंवा निवांत बसून स्वतःचा विचार करणं यांचा समावेश असतो.

या ट्रेंडचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. सोलो डेटिंगमुळे व्यक्ती अधिक स्वावलंबी बनते आणि स्वतःच्या नजरेत स्वतःचं मूल्य वाढतं. स्वतःला नव्याने ओळखण्याची, आवडी-निवडी समजून घेण्याची संधी मिळते. एकट्याने डेट करताना नवीन ठिकाणं एक्सप्लोर करता येतात आणि तिथली सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते, असं सोलो डेटिंगचे समर्थक सांगतात.

सोलो डेटिंग करायचं असेल तर सुरुवात आवडत्या ठिकाणापासून करता येते. जिथे मनाला सर्वात जास्त आनंद मिळतो, तिथे वेळ घालवा. स्वतःसाठी एखादं छोटंसं गिफ्ट घ्या, आवडता सिनेमा पाहा किंवा निवांत कॉफीचा आनंद घ्या. हा वेळ पूर्णपणे तुमच्यासाठी असल्यामुळे चिंता आणि तणाव बाजूला ठेवा. शक्य असल्यास सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या आणि त्या क्षणाचा पूर्णपणे आनंद घ्या. एकूणच, सोलो डेटिंग म्हणजे एकटेपण नाही, तर स्वतःशी नातं घट्ट करण्याचा नवा आणि सकारात्मक मार्ग असल्याचं आजच्या Gen Z पिढीचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ