अभिनेत्री पूजा बिरारीचाच नावावर मुहर? अद्याप अधिकृत घोषणा प्रलंबित
मराठी मनोरंजनक्षेत्रातील लोकप्रिय कलाकार आदेश बांदेकर (Adesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा मुलगा – सोहम बांदेकर – आता लग्नाच्या मार्गावर असल्याची चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. अखेर या चर्चांना मजबूत आधार मिळाला असून सोहम (Soham) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत त्याच्या थाटात पार पडलेल्या केळवणामुळे स्पष्ट झाले आहेत. या समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
सोहमच्या होणाऱ्या पत्नीचे नाव अद्याप जाहीर झाले नसले, तरी अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Bijari) हिच्याच नावावर चर्चेचा जोर आहे. ‘राजश्री मराठी’ने सूत्रांचा हवाला देत दोघांच्या लग्नाची माहिती काही दिवसांपूर्वी दिल्यानंतर चाहत्यांमध्ये या जोडप्याबद्दल उत्सुकता वाढली. पूजाने दिवाळीचे फोटो शेअर करताच सोहमने टाकलेली हार्ट इमोजी कमेंटही चर्चेची ठरली.
सोहमच्या केळवण सोहळ्यात ज्येष्ठ कलाकार सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले आणि अभिजीत केळकर यांच्यासह बांदेकर दाम्पत्य उपस्थित होते. फुलांच्या वर्षावात सोहमचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक मुंडावळा, उजळलेला चेहरा आणि समारंभातील औक्षण—सगळ्यांमुळे कार्यक्रम अधिकच देखणा झाला. कुरडई, पापड, पुरी, भाजी आणि गुलबाजाम असा खास मेन्यू पाहुण्यांना दिला गेला.
सोहम आणि पूजाच्या नात्याबद्दलची चर्चा काही नवीन नाही. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतील मंजिरी या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेली पूजा, बांदेकरांच्या घरच्या गणेशोत्सवाच्या आरतीतही दिसली होती. त्या व्हिडिओनंतर चाहत्यांनी दोघांच्या लग्नाविषयी अनेक कमेंट्स केल्या होत्या.
आता केळवणाच्या या जल्लोषामुळे त्यांच्या लग्नसोहळ्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखे वाटत असले, तरी वास्तविक लग्नाची तारीख अद्याप उघड केलेली नाही, यामुळे चाहत्यांची उत्सुकता मात्र तशीच कायम आहे.




