दीड लाख रुपये घेऊन घराबाहेर पडला होता; कुटुंबीयांकडून लूट व पोलिसांच्या निष्काळजीपणाचा आरोप.
सोशल मीडिया विश्वातून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय युट्यूबर आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर पुष्पेंद्र उर्फ आकाश (वय 31) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरातील आनंद विहार भागात एका रिकाम्या जागेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शनिवारी दुपारी घरातून बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला. सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी तीव्र संताप आणि दु:ख व्यक्त केले. त्याच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
आकाश हा मूळचा उत्तर प्रदेशातील अलीगढचा रहिवासी असून तो सध्या दिल्लीतील मंडावली भागात आई-वडील, पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह राहत होता. तो कपड्यांचे “स्टायलिंग” नावाचे शोरूम चालवत होता. सोशल मीडियावर तो फॅशनशी संबंधित व्हिडीओ बनवून कपड्यांच्या ब्रँडची जाहिरात करत असे आणि त्यामुळे तो अनेकांमध्ये लोकप्रिय झाला होता.
शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आकाश दीड लाख रुपये रोख घेऊन गांधी नगर मार्केटकडे निघाला होता. मात्र दुपारी सुमारे अडीच वाजल्यापासून त्याचा मोबाईल फोन बंद येऊ लागला. त्यानंतर चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी मंडावली पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, आकाशचा भाऊ सत्येंद्र यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी सुरुवातीला शोधमोहीम गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच कॉल डिटेल्स मिळवण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सोमवारी सायंकाळी कुटुंबीयांना डीडीएच्या एका झाडाझुडपांनी वेढलेल्या प्लॉटमध्ये आकाशचा मृतदेह आढळून आला. त्याचा मोबाईल फोनही मृतदेहाजवळ सापडला. मात्र त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि सोबत असलेले दीड लाख रुपये गायब असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे लूटमार करून विषारी पदार्थ देऊन त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पूर्व दिल्लीचे डीसीपी राजीव कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात मृतदेहावरून हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत नाही. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. तसेच लाचखोरीच्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,असे पोलिसांनी सांगितले आहे.




