आजच्या धावपळीच्या जीवनात झोप ही अनेकांच्या प्राधान्यक्रमातून हळूहळू बाजूला सरकताना दिसते. काहीजण कामाच्या ताणामुळे अपुरी झोप घेतात, तर काहीजण गरजेपेक्षा अधिक वेळ झोपण्यात घालवतात. मात्र झोपेचं प्रमाण योग्य नसलं, तर त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.
झोप ही फक्त आराम करण्यासाठी नसून, शरीराला नवसंजीवनी देणारी प्रक्रिया आहे. झोपेदरम्यान शरीरातील थकवा कमी होतो, मेंदू शांत होतो आणि नवीन ऊर्जेचा साठा तयार होतो. योग्य झोप घेतल्यास पचनक्रिया सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक स्थैर्य टिकून राहतं.
जर झोप अपुरी मिळाली, तर त्याचे दुष्परिणाम लगेच जाणवू लागतात. सतत थकवा, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, डोकेदुखी आणि अस्वस्थता यासारखी लक्षणं दिसतात. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हंही दिसू शकतात.
तसेच, गरजेपेक्षा जास्त झोप घेणंही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अधिक झोपेमुळे शरीर सुस्त होतं, पचनक्रिया मंदावते आणि आळस वाढतो. वजन वाढणं, गॅस, जडपणा आणि कामात मन न लागणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
झोपेची गरज ही वय, जीवनशैली आणि मानसिक स्थितीवर अवलंबून असते. लहान मुलांना अधिक झोप आवश्यक असते, प्रौढांसाठी संतुलित झोप महत्त्वाची असते, तर वृद्ध व्यक्तींना तुलनेने कमी झोप लागते. तज्ज्ञांच्या मते, रात्रीची नियमित आणि शांत झोप ही आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते.




