प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग यांच्या निवृत्तीबद्दलच्या अटकळ अजूनही चाहत्यांमध्ये आश्चर्याचा विषय असताना, आता लोकप्रिय गायिका श्रेया घोषालनेही गायनाबाबत कडक भूमिका घेतली आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्टेज परफॉर्मन्स आणि गायनाबद्दल तिचे स्पष्ट मत व्यक्त केले. श्रेयाने सांगितले की ती लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान कधीही लिप सिंकिंगवर अवलंबून राहत नाही. तिच्या मते, प्रेक्षकांसमोर गाणं सादर करताना खऱ्या आवाजात गायन करणं हेच कलाकाराचं खरं कर्तव्य आहे. ज्या दिवशी तिला लिप सिंकिंग करावी लागेल, त्या दिवशी ती गायन क्षेत्रातून दूर जाण्याचा निर्णय घेईल, असे तिने स्पष्टपणे सांगितले.
पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती असलेल्या श्रेयाने एका मुलाखतीत सांगितले की, कधी कधी तिलाही थोडा ब्रेक घ्यावासा वाटतो. मात्र संगीताशी असलेले नाते तिला नेहमीच पुढे काम करण्याची प्रेरणा देत असते.
याचवेळी तिने अरिजित सिंग यांच्या निर्णयाचेही कौतुक केले. तिच्या मते, अरिजीत हा संगीताशी अत्यंत मनापासून जोडलेला कलाकार आहे. तो प्रसिद्धी किंवा फायद्याचा विचार न करता केवळ त्याला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी संगीत तयार करतो. त्यामुळेच प्रेक्षक त्याच्यावर इतके प्रेम करतात, असेही ती म्हणाली.
श्रेयाने कलाकारांच्या जबाबदारीबाबतही मत व्यक्त केले. तिच्या मते, एंटरटेनर म्हणून वैयक्तिक आयुष्यातील अडचणी स्टेजवर दिसू देऊ नयेत. प्रेक्षक संगीत ऐकण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी येतात. त्यांच्या प्रेमामुळेच कलाकारांना उत्तम सादरीकरण करण्याची ऊर्जा मिळते. टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांशी होणारा संवाद हा तिच्यासाठी सर्वात मोठा प्रेरणास्रोत असल्याचेही तिने सांगितले.
श्रेया घोषाल हिने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 3000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. हिंदीसह बंगाली, कन्नड, तेलुगू, तमिळ, भोजपुरी, मल्याळम आणि मराठी अशा अनेक भाषांमध्ये तिच्या आवाजाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले आहे.




