spot_img

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्ग पर्यटनात नवा अध्याय, शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाचे पहिले पंचतारांकित हॉटेल

spot_img

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून ऐतिहासिक प्रकल्प; स्थानिकांना रोजगार व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एक ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर परिसरात ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५ स्टार) हॉटेल उभारले जाणार असून, यामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन नकाशावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटणार आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विशेष पुढाकार घेतला असून, त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प लवकरच भूमिपूजनाच्या टप्प्यावर येण्याची शक्यता आहे.

शिरोडा–वेळाघर येथील जागेसंदर्भात मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा. लि. (ताज समुह) यांनी सादर केलेल्या पुरक करारावर चर्चा करण्यासाठी आज पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ताज समुहाचे प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

या पंचतारांकित हॉटेलसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), स्थानिक ग्रामस्थ आणि ताज समुह यांच्यात लवकरच सामंजस्य करार केला जाणार आहे. ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या एक ते दोन आठवड्यांत हा मोबदला अदा करण्याचे स्पष्ट निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. तसेच या प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित कायदेशीर प्रकरणे मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून, स्थानिक युवकांसाठी नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यासोबतच पर्यटनपूरक व्यवसाय, स्थानिक हस्तकला, वाहतूक, हॉटेल उद्योग आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. पंचतारांकित हॉटेलमुळे परदेशी पर्यटकांचा ओघ वाढून सिंधुदुर्गचा पर्यटन विकास नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या बैठकीला आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (ऑनलाईन), ताज समुहाचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ