बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांनी अखेर त्यांच्या लहानग्या राजकुमारीचं नाव सर्वांसमोर आणलं आहे. शुक्रवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर मुलीच्या छोट्या पायांचा फोटो शेअर करत तिचं नाव जाहीर केलं आणि काही क्षणातच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
यंदाच्या जुलै महिन्यात कियाराने कन्येला जन्म दिल्यानंतर तिच्या नावाबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. हीच उत्सुकता संपवत दोघांनी आपल्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ असं ठेवत, “आमच्या प्रार्थनांपासून आमच्या बाहूपर्यंत… दैवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारीपर्यंत” अशा भावनिक शब्दांत घोषणा केली. ‘सरायाह’ हा शब्द हिब्रू भाषेतील ‘सारा’ या शब्दावरून प्रेरित असून त्याचा अर्थ ‘राजकुमारी’ असा होतो, असं मानलं जातं.
पहिल्यांदाच पालक बनलेल्या या दाम्पत्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या खासगी क्षणांचा आदर राखण्याची विनंती पापाराझींना केली होती. “आमचं जग नव्याने खुललं आहे. आमच्या मुलीच्या आगमनाने आमच्या आयुष्यात प्रकाश आला आहे. कृपया तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढू नका, फक्त आशीर्वाद द्या,” असा संदेश त्यांनी चाहत्यांना दिला होता.
२०२३ मध्ये जैसलमेर येथे विवाहबद्ध झालेल्या कियारा–सिद्धार्थच्या संसारात दोन वर्षांनंतर आलेला हा गोड आनंदकल्लोळ सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलकमध्ये सरायाहचा जन्म झाला होता. फेब्रुवारीत कियाराने गर्भधारणा जाहीर केल्यानंतरपासूनच या जोडप्याच्या चाहत्यांना या क्षणाची आतुरता होती.




