उपकर्णधार असलेला गिल शेवटच्या सामन्यापर्यंत संघासोबत, पण वर्ल्ड कप स्क्वाडमधून अचानक डच्चू
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा होताच सर्वात जास्त चर्चा शुबमन गिलच्या (Shubman Gill) अनुपस्थितीची झाली. वनडे आणि टेस्टमध्ये भारताचा कर्णधार, तर टी-20 मध्ये उपकर्णधार असलेल्या गिलला वर्ल्ड कप संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला. सलग तीन सामने ओपनिंग करणाऱ्या खेळाडूला अचानक बाहेर ठेवण्याचा हा निर्णय अनेकांना अनपेक्षित वाटतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) टी-20 मालिकेतील शेवटचा सामना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय स्क्वाड जाहीर करण्यात आला. अहमदाबादमधील त्या सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळाली आणि त्याने केवळ २२ चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, संपूर्ण मालिकेत गिलने केलेल्या ३२ धावांपेक्षा सॅमसनने एका सामन्यात जास्त धावा केल्या.
कामगिरीच्या आकडेवारीकडे पाहता हा निर्णय योग्य वाटू शकतो. मात्र, आशिया कपदरम्यान गिलला अचानक उपकर्णधारपद देण्यात आलं, सलग मालिका खेळवल्या गेल्या आणि ओपनिंगची जबाबदारीही देण्यात आली. अशा परिस्थितीत वर्ल्ड कपच्या तोंडावर त्याला संघाबाहेर ठेवणं अनेकांना गोंधळात टाकणारं आहे.
या सगळ्यात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने गिलचा वर्ल्ड कप संघात समावेश न करण्याचा निर्णय तब्बल ४८ तास आधीच घेतला होता. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादव किंवा प्रशिक्षक गौतम गंभीर यापैकी कुणीही ही बाब गिलला सांगितली नाही. तो शेवटच्या सामन्यापर्यंत संघासोबतच होता.
लखनऊमधील चौथा टी-20 सामना रद्द होण्याआधीच गिलच्या पायाला दुखापत झाली होती, पण ती फार गंभीर नव्हती. तो पेनकिलर इंजेक्शन घेऊन अखेरच्या सामन्यात खेळायला तयार होता. तरीही त्याला संधी देण्यात आली नाही. कारण स्पष्ट होतं — वर्ल्ड कप स्क्वाडमध्ये त्याचा समावेश करण्याचा निर्णय आधीच रद्द करण्यात आला होता. यामुळे शुबमन गिलसाठी हा केवळ संघाबाहेर जाण्याचा नाही, तर संवादाच्या अभावाचा देखील मोठा धक्का मानला जात आहे.




