चाकणमध्ये अनोखी राजकीय एकजूट; कणकवलीत हातमिळवणीची शक्यता तर सिंधुदुर्गात सामना तुटणार
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत (Municipal Council and Nagar Panchayat)निवडणुकांचे राजकारण दिवसेंदिवस रंगत चाललं आहे. अनेक ठिकाणी आघाड्या कोसळताना दिसत आहेत तर काही ठिकाणी विरोधक अनपेक्षितरीत्या हातात हात घालत आहेत. राजकारणातील कायमचे ‘मित्र’ एकमेकांविरोधात उभे राहताना तर जुने ‘शत्रू’ एकत्र येताना या निवडणुकांचा रंग अधिकच चढला आहे.
सर्वांत मोठा धक्का म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांकडे पाहायलाही तयार नसलेले शिंदे आणि ठाकरे (Shinde-Thackeray) गट चाकणमध्ये एका व्यासपीठावर दिसले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी झालेल्या या एकत्र येण्याने शिवसैनिकांचा उत्साह दुप्पट झाला आहे.
चाकण नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांच्या अर्जभरणावेळी दोन्ही गटातील आमदार शरद सोनवणे (शिंदे गट) आणि बाबाजी काळे (ठाकरे गट) एकत्र आले. दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी असल्याने स्थानिक स्तरावर आदराचे राजकारण करत आम्ही पाठिंबा दिला, ही युती नाही, असे काळेंनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की राजगुरुनगर आणि आळंदीत ते स्वबळावर लढणार आहेत.
कणकवलीत मात्र वेगळंच समीकरण तयार होत आहे. शहर विकास आघाडीने पुढाकार घेतल्याने ठाकरे सेना आणि शिंदे सेना एका मंचावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर निलेश राणे यांनीही सकारात्मक संकेत दिले आहेत.
पण सिंधुदुर्गात मात्र समीकरणं विरघळताना दिसत आहेत. भाजप–शिवसेना युतीची शक्यता मंदावत असून दोन्ही पक्ष आमनेसामने उभे राहणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालवणमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना निलेश राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट भाजपाला इशारा दिला “आमची ताकद पाहायची असेल तर तीन तारखेला फटाके पहा.”
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरण अधिकच धगधगत असून पुढील काही दिवसांत आणखी अनपेक्षित चित्र पलटी होताना दिसण्याची चिन्हे आहेत.




