एआय-जनरेटेड बनावट फोटो-व्हिडीओ तात्काळ हटवण्याचे निर्देश, व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांवर न्यायालयाची ठाम भूमिका
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने आणि चेहऱ्याचा गैरवापर करून एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेले डीपफेक फोटो आणि व्हिडीओ प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकारचा कंटेंट अत्यंत आक्षेपार्ह, मानसिक त्रास देणारा आणि धक्कादायक असल्याचं नमूद करत न्यायालयाने संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाइट्सना तो तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिल्पा शेट्टीला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर झाली. कोणत्याही व्यक्तीची—विशेषतः महिलांची—परवानगीशिवाय प्रतिमा, आवाज किंवा नावाचा वापर करून अशा स्वरूपाचं सादरीकरण करणं हे त्यांच्या गोपनीयतेच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. अशा प्रकारे एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केलेला कंटेंट स्वीकारार्ह नसल्याचंही न्यायालयाने ठामपणे सांगितलं.
शिल्पा शेट्टीने याचिकेत असा आरोप केला होता की, तिच्या संमतीशिवाय फोटो मॉर्फ करण्यात आले, बनावट व्हिडीओ तयार करण्यात आले आणि एआयच्या सहाय्याने तिचा आवाजही क्लोन करण्यात आला. या सर्व गोष्टी तिच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेला गंभीर धक्का पोहोचवणाऱ्या असल्याचं नमूद करत तिने संबंधित वेबसाइट्सविरोधात मनाई आदेशाची मागणी केली होती. न्यायालयाने प्रतिवादींना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील संबंधित URL काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
कामाच्या आघाडीवर, शिल्पा शेट्टी 2023 मध्ये ‘सुखी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. आता 2026 मध्ये ती एका बहुचर्चित कन्नड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असून या चित्रपटात ध्रुव सर्जा, संजय दत्त, नोरा फतेही यांच्यासह अनेक कलाकार सहभागी आहेत.




