‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधून प्रसिद्धी मिळवलेली गायिका शरयू दाते सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या शरयूने आता चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
शरयूने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत तिच्या प्रपोजलचा सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. या फोटोमध्ये विभास वटवे गुडघ्यावर बसून तिला अंगठी घालताना दिसत आहे. “माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटा, जो आता माझा होणारा नवरा आहे,” अशा शब्दांत तिने त्याची ओळख करून दिली.
केनियामधील या सुंदर सफारीदरम्यान विभासने तिला सरप्राइज प्रपोज केलं, ज्यामुळे हा क्षण आणखी खास बनला. या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नेहा पेंडसे, प्रियांका बर्वे, मुग्धा वैशंपायन, स्पृहा जोशी आणि सलील कुलकर्णी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. शरयू दाते ही मराठी संगीतसृष्टीतील एक लोकप्रिय नाव असून ‘आनंदी गोपाळ’, ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’, ‘फुलराणी’ आणि ‘रमा माधव’सारख्या चित्रपटांतील तिची गाणी विशेष गाजली आहेत.




