पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत दोन्ही शहरांमध्ये सत्ता मिळवली आणि विरोधकांची गणितं पूर्णपणे कोलमडली. मुंबईत ठाकरे गटाला फटका बसल्यानंतर आता पवारांची राजकीय ताकद कमी झाली का, हा प्रश्नही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
पुण्यातील १६५ जागांपैकी भाजपने तब्बल १२० जागांवर विजय मिळवत एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं. अजित पवार गटाला केवळ २६ जागांवर समाधान मानावं लागलं, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ३ जागा मिळाल्या. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने १२८ पैकी ८४ जागा जिंकत बाजी मारली. अजित पवार गट ३७ जागांवर थांबला, तर शरद पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही.
या निकालांनी दोन्ही पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. ‘काका थांबावेत’ या विधानापासून ते ‘काकांच्या अनुभवाची गरज’ या भावनिक भूमिकेपर्यंत अजित पवारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा फारसा फायदा झाला नाही. भाजपविरोधात आक्रमक प्रचार करूनही अपेक्षित यश मिळालं नाही. तरीही राजकीय अनुभवामुळे अजित पवारांना हलक्यात घेणं धोकादायक ठरेल, असं जाणकार मानतात.
दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये पक्षाला एकही जागा मिळू शकली नाही. दोन राष्ट्रवादी, दोन चिन्हांचा प्रयोगही मतदारांच्या मनावर ठसा उमटवू शकला नाही. तरीही शरद पवारांकडे आजही पक्षाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे, असं कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे.
आता पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे – दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार महायुतीकडे झुकणार का? आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार या पराभवाचं उत्तर कसं देणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच राज्याच्या राजकारणात नवं वळण घेऊन येतील, यात शंका नाही.




