अरबी समुद्रात अचानक बुडबुडे आणि उंच लाटा, गॅस गळती किंवा भूगर्भीय हालचालींची शक्यता
अरबी समुद्राच्या गुजरात किनारी भागात समुद्राचे पाणी अचानक उकळत असल्यासारखे दृश्य दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काही मच्छिमारांनी समुद्राच्या पृष्ठभागावर निर्माण होणारे मोठे बुडबुडे आणि असामान्य लाटांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रशासनाकडे पाठवले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रातील पालघरपासून गुजरातपर्यंतच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, समुद्राखाली असलेल्या मोठ्या औद्योगिक पाइपलाइनमधून गळती झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हा प्रकार अज्ञात भूगर्भीय हालचाल किंवा विषारी वायू बाहेर पडल्यामुळे झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पालघर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मच्छिमारांना या परिसरापासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
या घटनेबाबत बोलताना पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी ही परिस्थिती गंभीर आणि असामान्य असल्याचे सांगितले. समुद्राच्या पृष्ठभागावर सतत उकळत असल्यासारखा भाग दिसणे ही सामान्य बाब नसून, यामागे खोल समुद्रातील एखादी मोठी प्रक्रिया कारणीभूत असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सागरी तज्ज्ञ, औद्योगिक विभाग आणि तांत्रिक संस्था तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पाण्याचे नमुने घेतले जात असून परिसरातील पर्यावरणीय आणि तांत्रिक माहितीचा सखोल अभ्यास केला जात आहे.
या भागातून अनेक औद्योगिक पाइपलाइन आणि दळणवळण केबल्स जात असल्यामुळे जर गळतीची पुष्टी झाली, तर त्याचा सागरी पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच गॅस गळती असल्यास आग लागण्याचा किंवा ऑक्सिजन पातळी घटण्याचा धोका असल्याने जहाजांना आणि बोटींच्या वाहतुकीलाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुढील तपास अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.




