74 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई: भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन विश्वातील एक चमकता तारा, ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह (Satish Shah) यांचे शनिवारी मुंबईत दुखःद निधन झाले. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.हिंदुजा रुग्णालयाच्या निवेदनानुसार, शनिवारी सकाळी सतीश शाह यांच्या प्रकृतीबाबत आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तातडीने त्यांच्या निवासस्थानी पोहोचली, जिथे ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. रुग्णवाहिकेत त्यांना सीपीआर देण्यात आले आणि रुग्णालयात आणल्यानंतरही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना वाचवता आले नाही.
चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी सोशल मीडियावर सतीश शाह यांच्या निधनाची माहिती देताना सांगितले की, दुपारी 2:30 वाजता किडणी निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. “सतीश शाह माझे जवळचे मित्र आणि एक अप्रतिम कलाकार होते. आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांच्या निधनाची बातमी मला पियुष पांडे यांच्या अंत्यसंस्काराहून परतताना समजली,” असे पंडित यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले.सतीश शाह यांचे अंतिम संस्कार रविवारी दुपारी 12 वाजता मुंबईत होणार आहेत. हिंदुजा रुग्णालयाने शाह यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करताना म्हटले, “सतीश शाह यांचे भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहील. या दुखःद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना मनापासून सहानुभूती व्यक्त करतो.” सतीश शाह यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक बहुआयामी कलाकार गमावला आहे, ज्यांचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायम राहील.




