प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने जेव्हा पद्म पुरस्कारांची घोषणा केली, तेव्हा मनोरंजन विश्वात आनंदासोबतच हळहळही व्यक्त करण्यात आली. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या १३१ मान्यवरांच्या यादीत, दिवंगत सुपरस्टार धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ आणि अभिनेते सतीश शाह यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ जाहीर झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ कुटुंबाचे डोळे पाणावले.
सतीश शाह यांचे पडद्यावरील चिरंजीव म्हणजेच अभिनेता सुमित राघवन याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना एक महत्त्वाचा खुलासा केला. सुमित म्हणाला, “काल रात्री मला माझ्या एका आयपीएस (IPS) मित्राचा फोन आला. गृह मंत्रालयाला सतीश शाह यांच्या जवळच्या खास सहाय्यकाचा नंबर हवा होता, जेणेकरून या सन्मानाची अधिकृत माहिती त्यांच्या घरापर्यंत पोहोचवता येईल.” सुमितने तातडीने सतीशजींच्या सेक्रेटरीला फोन करून या वृत्ताची खातरजमा केली.
सतीश शाह यांना ‘पद्मश्री’ मिळाल्याचा अभिमान वाटत असला, तरी सुमित राघवनच्या मनात एक सल कायम आहे. “हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहेच, पण मन कुठेतरी विचारतय की, कलाकार आपल्यात असतानाच हे सन्मान का दिले जात नाहीत? सतीश काकांनी स्वतः हा पुरस्कार स्वीकारला असता, तर त्या आनंदाची सर कशालाच आली नसती,” अशा शब्दांत सुमितने आपल्या भावना व्यक्त केल्या. २५ ऑक्टोबर रोजी सतीश शाह यांच्या निधनाने जो मोठा आघात कुटुंबावर झाला होता, त्यावर हा पुरस्कार फुंकर घालण्याचं काम करेल, असंही त्याने नमूद केलं.




