spot_img

Satara News : साताऱ्याचा वीरपुत्र शहीद; चीन सीमेजवळ ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’दरम्यान बाळकृष्ण निकम यांचे बलिदान

spot_img

शौर्य आणि बलिदानाची परंपरा जपणाऱ्या सातारा जिल्ह्याने पुन्हा एकदा आपल्या सुपुत्राला गमावले आहे. पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे जवान बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४२) यांनी सिक्कीममधील चीन सीमेजवळ कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले. ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ अंतर्गत अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत असताना त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. विशेष म्हणजे, तब्बल २३ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावल्यानंतर ते लवकरच निवृत्त होणार होते.

बाळकृष्ण निकम गेली दोन दशके भारतीय सैन्यात कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती सिक्कीममधील चीन सीमेलगतच्या अतिदुर्गम आणि अत्यंत थंड प्रदेशात होती. ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’सारख्या आव्हानात्मक मोहिमेदरम्यान प्रतिकूल हवामान आणि कठीण परिस्थितीशी सामना करताना त्यांचे निधन झाले. शुक्रवारी लष्कर मुख्यालयाकडून ही दु:खद माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आणि काही क्षणांतच ही बातमी संपूर्ण पाटण तालुक्यात पसरली.

ही बातमी समजताच पिंपळोशी गावासह परिसरात शोककळा पसरली. सुट्टीवर गावी आल्यानंतर बाळकृष्ण निकम गावातील प्रत्येकाशी आपुलकीने वागायचे. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबीयांचाच नाही, तर संपूर्ण गावाचा आधार हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

निकम यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी अत्यंत हृदयद्रावक वातावरण होते. वृद्ध आईचा आक्रोश आणि वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी पूनम, भाऊ शिवराज, बहीण रूपाली आणि अर्णव व प्रणव ही दोन लहान मुले असा परिवार आहे.

दरम्यान, शहीद बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव लष्करी विमानाने पुण्यात आणले जाणार असून तेथून रुग्णवाहिकेद्वारे त्यांच्या मूळ गावी पिंपळोशी येथे नेले जाईल. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात तसेच लष्करी सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ