सातारा (Satara) जिल्ह्यात निवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. पाल जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवाराच्या भावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
भाजपचे उमेदवार माधवराव काळभोर यांच्या भावाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब साळुंखे चोरेकर यांना मारहाण केली. बाळासाहेब चोरेकर हे देवदर्शनावरून परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे उमेदवार देवराज पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या राड्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी आता उंब्रज पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




