राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढत असतानाच सातारा जिल्ह्यात पुन्हा अपघात झाला आहे. पाटण तालुक्यातील निवकणे परिसरात भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी जळव घाटात पलटी झाल्याने एक महिलेचा मृत्यू झाला असून सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक जानाई देवीच्या दर्शनासाठी जात होते. घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने साताऱ्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर जखमींवर जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवले. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, निवकणे हे जानाई देवीचे महत्त्वाचे धार्मिक स्थान मानले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीनंतर पालखी सोहळा येथे येतो आणि मोठ्या उत्साहात यात्रा साजरी केली जाते. यंदाही यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असताना हा अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




