spot_img

Sanjay Shirsat : मुंबईतील युतीवर संभ्रम नाही, महायुतीचाच झेंडा फडकेल शिरसाटांचे राजकीय विधान

spot_img

मुख्यमंत्रीपद, जागावाटप, ठाकरे गटावर टीका आणि AI व्हिडिओंवर इशारा

मुंबईतील युतीबाबत सध्या काही ठिकाणी मतभेद आणि नाराजी दिसत असली तरी युती होणार नाही, अशी शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही, असा विश्वास मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. कोणत्या जागा कोणाकडे जातील याबाबत अंतिम स्पष्टता अद्याप नसली, तरी कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सर्व पक्षांची असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचा झेंडा पुन्हा फडकणार असून देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांची बैठक पुन्हा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले असले, तरी राजकारणात संयम आवश्यक असतो आणि तो आम्ही पाळत आहोत, असे शिरसाट म्हणाले. सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्याला “पब्लिसिटी स्टंट” असल्याचा टोला लगावला.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का, या प्रश्नावर शिरसाट यांनी ठामपणे उत्तर देत “100 टक्के होतील, तसे वाटण्याचे आम्हाला पूर्ण कारण आहे,” असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, सहा सभा म्हणजे जरा जास्तच झाल्या. ‘तूच लढ’ ही त्यांची भूमिका असून ते ‘इन्कमिंग’ नाहीत, तर ‘आऊटगोइंग’ आहेत. पुढील काळात त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत, अनेकजण साथ सोडत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

भाजप हा राज्यातील मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादीने त्यांच्याशी बोलणे योग्य समजले असेल किंवा अधिक जागा मिळत असल्याने ते तिकडे गेले असतील, असे मत शिरसाट यांनी व्यक्त केले. आमचा पक्ष तुलनेने छोटा असल्याने जास्त जागा मिळणे शक्य नसते, असेही ते म्हणाले.

AI च्या माध्यमातून नेत्यांचे पैशांसोबतचे बनावट व्हिडिओ तयार केले जात असल्याचा आरोप करत शिरसाट यांनी यामागे राजकीय दुष्मनी असल्याचे सांगितले. पारंपरिक मतदार उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ नयेत, यासाठी हे प्रकार होत असून काँग्रेसने नेहमीच ‘फूट पाडा आणि राज्य करा’ ही नीती वापरली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. महाविकास आघाडीतील ‘सन्मानजनक’ या शब्दावर प्रश्न उपस्थित करताना शिरसाट म्हणाले की, जागा दिल्या नाहीत, यादी दिली नाही, मग सन्मानजनक याचा अर्थ नेमका काय? ज्यांची पालखी घेऊन ठाकरे गट फिरत होता, त्यांनीच आता त्यांची साथ सोडली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ