भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गोऱ्हे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि त्या राजकीय लाभासाठी त्यांची भेट घेत असत. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना वेगळा दृष्टिकोन मांडला.
माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले की, भोंदूबाबा किंवा अशा व्यक्तींचा अनेक जण स्वतःच्या कामासाठी वापर करत असतात, विशेषतः जेव्हा त्यांचा संपर्क एखाद्या आमदार, खासदार किंवा मंत्र्यांपर्यंत पोहोचतो. मात्र, केवळ एखाद्याची भेट घेणे हा गुन्हा ठरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, अनेक लोक विविध नेत्यांना भेटतात, पण त्यातून कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. एखाद्या प्रकरणात थेट सहभाग असल्यासच तो गुन्हा मानला जातो, असे त्यांनी ठामपणे सांगितले.




