प्रकृती बिघडल्याने भांडूपमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल, “हात लिहित राहिला पाहिजे” राऊत यांचा हटके संदेश सोशल मीडियावर व्हायरल
शिवसेना (ठाकरे गट) चे ज्वलंत नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाल्याने त्यांना मुंबईतील भांडूप येथील फोर्टिस (Fortis) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्याच्या कारणास्तव ते अलीकडच्या काळात सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांपासून दूर होते. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू आहेत.
याचदरम्यान संजय राऊत यांनी रुग्णालयातून एक खास फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आश्वस्त केले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ते रुग्णालयातील बेडवर बसलेले दिसतात. हातात सलाईन असूनही ते पेन आणि पेपर घेऊन काही लिहीत असल्याचे दिसते. त्या पेपरवर “Edit” असे लिहिलेले असल्याने अनेकांनी ते सामना या पक्षाच्या मुखपत्रासाठी अग्रलेख तयार करत असावेत असा अंदाज वर्तवला आहे.
या पोस्टसोबत राऊत यांनी एक प्रेरणादायी ओळ लिहिली
हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता!
त्यांचा हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून समर्थकांकडून त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पूर्वी शेअर केलेल्या पत्रकातही संजय राऊत यांनी आपल्या प्रकृतीबाबत स्पष्टपणे माहिती दिली होती. त्यांनी लिहिले होते की, “अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे. उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच यातून सावरून बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार सध्या मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे टाळावे लागेल.” ते पुढे म्हणाले, “मी नवीन वर्षात ठणठणीत बरा होऊन पुन्हा आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम असू द्या.”
सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती जवळच्या सूत्रांकडून मिळत असून, पूर्ण विश्रांतीनंतर ते आपल्या मैत्री निवास’ येथे परततील, अशी अपेक्षा आहे.




