ठाकरे बंधूंवर टीका करणाऱ्या शेलारांना राऊतांचा सणसणीत टोला!
शिवाजी पार्क ते टिळक भवनापर्यंत हिंदुत्वाचा रंग फिका पडल्याचा टोमणा भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे बंधूंना लगावला. पण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याला चोख प्रत्युत्तर देत शेलार आणि भाजपला चांगलंच सुनावलं. “राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटकं करू नका,” असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला. त्यांनी भाजपला विचारलं, “तुमच्याकडे स्वतःचं काय आहे? स्वतःची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार?”राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत म्हटलं की, ठाकरे बंधूंचा रंग पक्का आहे, तो कोणी खरवडू शकत नाही.
“भाजपचा खरा रंग काय? भ्रष्टाचार आणि काँग्रेसचा रंग! त्यांच्या पक्षात 90 टक्के लोक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेतून आलेले आहेत. मग स्वतःचं नेतृत्व कुठं आहे?” असा खोचक सवाल राऊतांनी केला. त्यांनी पुढे उदाहरण देत म्हटलं, “कालच शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाच्या बातम्या आल्या. त्यांना भाजप नेते म्हणून ओळखलं गेलं, पण त्यांचं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेलं. काही काळ ते शिवसेनेतही होते. भाजपमधले बहुतेक नेते बाहेरूनच आलेले आहेत. मग त्यांच्याकडे स्वतःचं काय आहे?” राऊतांनी ठाकरे बंधूंना एकत्र काम करणारी ताकद असल्याचं सांगत भाजपच्या टीकेला धारदार प्रत्युत्तर दिलं.




