निवडणूक आयोगावर साटेलोट्याचा आरोप, सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलनाचे संकेतमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना ठाण्यातील जनता कोणाचा बँड वाजवणार हे दाखवून देईल, अशी खोचक टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ठाणे आणि मुंबईतील जनता गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही. त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करताना म्हटले की, विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत घोटाळे, पैशांचा वापर आणि यंत्रणेचा गैरवापर करून विजय मिळवला गेला. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीत असे प्रकार खपवले जाणार नाहीत.
राऊत पुढे म्हणाले की, सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांमधील साटेलोटे उघड केले आहे. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. जर आयोगाने पुरावे आणि निवेदनांकडे दुर्लक्ष केले, तर रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, असे राऊत यांनी ठणकावले. नुकतीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून, शरद पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकमत होत आहे. राऊत यांनी शिंदे गटाला थेट आव्हान देताना म्हटले, “मुंबई आणि ठाण्यातील जनता तुमच्या गद्दारीच्या स्वप्नांना चूर करेल. घोटाळ्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही!” या राजकीय चिखलफेकीमुळे ठाणे आणि मुंबईतील निवडणूक रंगतदार होणार असून, जनतेचा कौल कोणाला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल.




