मुंबई महापौर पदावरून राजकीय रणधुमाळी; संजय राऊतांचा शिंदे सेनेवर हल्लाबोल
मुंबई महापौर पदाची निवड नेमकी कधी होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसतानाच मुंबईच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दावोस दौऱ्यावरून परतताच जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय झाले असून, त्याचवेळी मुंबई महापौर पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाने स्वतंत्र गट स्थापन करत महापौर पदावर दावा केल्यानंतर भाजपही संख्याबळाच्या जोरावर ही संधी सोडायला तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सेनेवर जोरदार आणि जहरी टीका केली.
मुंबईचा महापौर अखेर भाजपचाच होईल आणि शिंदे सेना निमूटपणे त्याला पाठिंबा देईल, असा थेट दावा राऊत यांनी केला. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट स्थापनेसाठी कोकण भवनात जात असतानाच राऊतांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणाले की, शिंदे गटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे वंदनीय आहेत, मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांना काहीच देणंघेणं उरलेलं नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तेव्हा शिंदे सेनेतून एक शब्दही निषेधाचा निघाला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिंदे शिवसेना ही भाजपची “अंगवस्त्र” असल्याचा घणाघात करत, फारतर एखादी साडी-चोळी पदरात पडेल, असा बोचरा टोला त्यांनी लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे जर मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल, तर आपण त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, असे उपरोधिक वक्तव्य राऊतांनी केले. कोश्यारी यांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी केलेली पाठराखण ही दिल्लीच्या आदेशानुसार होती, असा आरोपही त्यांनी केला. काल मंत्री गिरीश महाजन यांनीही हीच परंपरा पुढे नेल्याचा टोला राऊतांनी लगावला.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कट्टर शिवसैनिक असून त्यांनी कधीही पक्षांतर केलेले नाही. असे दावे निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उलट, उदय सामंत स्वतः मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केला. दावोसमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती तुम्हाला आहे का, असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत हालचालींवर बोट ठेवले.




