राजकीय टीकेचा सूर अधिक तीव्र करत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट दिल्लीच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. “कोण काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. काही लोक दिल्लीचे बूट चाटण्याचं राजकारण करत आहेत. त्यांच्याच मनात भीती आहे आणि तीच भीती त्यांच्या वक्तव्यातून बाहेर येते,” असा जोरदार आरोप त्यांनी केला.
मराठी माणसाच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त करत राऊत म्हणाले की, “मराठी माणूस एक आहे आणि त्याचं नेतृत्व राज ठाकरे (Raj Thackeray) व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करतील. मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक या महापालिका एकत्र लढवण्याचा निर्णय झाला असून जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. इतर महापालिकांमध्येही शक्य तिथे एकत्र लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही विरोध झाला, तरी स्वराज्य उभं राहिलं. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना देखील विरोध झेलला, पण त्यांनी त्यावर मात केली. आजही तसाच संघर्ष सुरू आहे.”
दिल्ली समर्थकांवर टीका करत राऊत म्हणाले, “दिल्लीचे बूट कसे चाटायचे याची रंगीत तालीम सुरू आहे. पण मध्यमवर्गीय आणि तळागाळातील मराठी माणूस ठामपणे शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने उभा आहे,” असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “काँग्रेसने आमच्यासोबत यावं, ही आमची भूमिका आहे. जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यात लक्ष घातलं आहे. आघाडीत प्रत्येक ठिकाणी मनासारखं होत नाही, काही ठिकाणी त्याग करावा लागतो.” उत्तर भारतीयांविरोधातील बॅनरवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केलं की, “हे भाजप आणि शिंदे गटाचं काम आहे. हिंदी भाषिकांना मुद्दाम अस्वस्थ करण्याचा हा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मी मुंबईकर’चा नारा दिला होता. शिवसेनेने विनाकारण कुणावरही हल्ला केलेला नाही.” सीमाभागातील प्रश्नावर सरकारवर टीका करत राऊत म्हणाले, “कर्नाटक सीमाभागात मराठी माणसावर हल्ले होत आहेत. यावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी साधा निषेधही केलेला नाही. उत्तर प्रदेशातही मराठी माणसावर हल्ले होत आहेत.”
भाजप आमदार पराग शाह यांच्या कथित मारहाणीचा मुद्दा उपस्थित करत राऊत म्हणाले, “गरीब मराठी रिक्षावाल्याला मारण्याचा अधिकार भाजप आमदाराला कोणी दिला? यावर प्रश्न का विचारले जात नाहीत?” असा थेट सवाल त्यांनी केला.




