मुंबईतील हॉटेल व्यवसाय धोक्यात, गॅससाठी रांगा; सर्वपक्षीय बैठकीची राऊतांची मागणी
सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. “आखाती देशांतील युद्धामुळे इंधन विहिरी पेटल्या असताना सरकार जनतेला खोटे आश्वासन देत आहे,” असा आरोप करत राऊत यांनी देशात गंभीर इंधन आणि गॅस टंचाई असल्याचे ठामपणे मांडले. मुंबईसारख्या महानगरात ४० टक्के हॉटेल व्यवसाय बंद पडला असून कामगार गावाकडे स्थलांतरित होत असल्याचे भीषण वास्तव त्यांनी मांडले.
राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी केवळ धार्मिक भावना भडकवून आणि स्वतःचे ‘भजन’ करून ही परिस्थिती बदलू शकत नाहीत. इराण-इस्रायल संघर्षाचा दाखला देत त्यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. विशेषतः, “पंतप्रधान मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत,” असा गंभीर आरोप करत त्यांनी असा दावा केला की, उपलब्ध तेल आणि गॅस साठा प्रथम गुजरातकडे वळवला जात असून उर्वरित देशाला वाऱ्यावर सोडले जात आहे.
या संकटाच्या काळात केवळ प्रचारात मग्न न राहता, मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सर्वपक्षीय नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करून या विषयावर सखोल चर्चा होणे गरजेचे असल्याचे सांगत, त्यांनी सरकारला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. जनतेच्या हवालदिल परिस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय स्वार्थ साधणे देशाला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.




