अजितदादांचा विमान अपघात की घातपात? महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता दिवसेंदिवस अधिकच गंभीर वळण घेत आहे. या अपघातामागे ‘घातपात’ असल्याचा दाट संशय व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असून, त्यांच्या समर्थनार्थ बारामतीत वकिलांसह नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीकेची झोड उठवली. “डीजीसीए हे एक भ्रष्ट खाते असून त्यांना अनेक राजकारण्यांचे आशीर्वाद आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, “सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केले म्हणून काय फाईल बंद होते का?” असा टोकदार सवाल करत त्यांनी सुनेत्रा पवारांनाही मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. या कंपनीत अनेक बड्या नेत्यांचे पैसे गुंतले असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे राऊत म्हणाले. “ब्लॅक बॉक्स सुरक्षित असतानाही डीजीसीए खोटे बोलत आहे,” असा घणाघात करत त्यांनी सीबीआय चौकशीच्या फलश्रुतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, महाविकास आघाडी राज्यसभेच्या जागांबाबत आणि आगामी निवडणुकांबाबत एकत्र निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




