घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका; राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबतही व्यक्त केली चिंता
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या निधनानंतर काही दिवसांतच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे अभिनंदन केल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मोदी ठाकरे आणि गांधी कुटुंबावर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करत असतात. मात्र, आता सुनेत्रा पवारांचे अभिनंदन करून त्यांनी स्वतःच त्या भूमिकेवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे यापुढे किमान घराणेशाहीवर भाष्य करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा आणि भाजपचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाकडे आमदार आहेत आणि त्या पातळीवर निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, अजित पवारांचा पक्ष हा कष्टकरी, ग्रामीण आणि मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष राहिला आहे, असं राऊत म्हणाले.
अजित पवारांनी शरद पवारांप्रमाणेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही. मात्र, आता हा पक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या प्रभावाखाली जाण्याची शक्यता निर्माण होत असल्याची चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली. हा पक्ष भोसले, पाटील, मोहिते, कांबळे यांचा आहे; तो कुणा एका व्यक्तीपुरता मर्यादित होऊ नये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षाची सूत्रं मराठी नेतृत्वाकडेच राहणं गरजेचं आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या अस्मितेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच भाजपच्या सध्याच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भाजप आता स्वतःच्या बळावर राजकारण करू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या आधारावर महाराष्ट्रातील निष्ठावान व्यक्ती, संस्था आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.




