spot_img

Sanjay Raut : महापालिका निवडणुकीत दबाव, धमक्या आणि बिनविरोध खेळी? संजय राऊतांचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

spot_img

निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा हस्तक्षेप, सीसीटीव्ही फुटेज गायब आणि उमेदवारांना माघारीसाठी धमकावल्याचा दावा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी यंत्रणांकडून लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार अर्ज मागे घ्यावेत यासाठी निवडणूक अधिकारी आणि सत्ताधारी मंत्र्यांकडून दबाव, धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणूक अधिकारी संबंधित पालकमंत्र्यांच्या प्रभावाखाली काम करत असून ही स्थिती किती काळ सहन करायची, असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारचा हस्तक्षेप मान्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या निवासस्थानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा असल्याचे निदर्शनास आल्याचे राऊत म्हणाले. त्यामध्ये काही निवडणूक निर्णय अधिकारी (आर.ओ.) होते. आचारसंहिता लागू असताना अधिकाऱ्यांनीच तिचे उल्लंघन केल्यास ते उमेदवारांना कोणत्या नैतिक अधिकाराने नियम पाळायला सांगणार, असा सवाल त्यांनी केला.

निवडणूक आयोगाने सर्व संबंधित आर.ओंचे कॉल रेकॉर्ड तपासावेत. कोणत्या मंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे फोन आले आणि त्यानंतर कोणते उमेदवारी अर्ज बाद झाले, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमक्या दिल्याचा दावा करत ३० डिसेंबर रोजी दुपारी चार नंतरचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. हे फुटेज गायब असल्याची माहिती असून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कसे काय गायब होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी हेही या संपूर्ण प्रकरणात सामील आहेत का, असा संशय व्यक्त करत सीसीटीव्ही फुटेज गायब होण्याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. संबंधित विभागातील आर.ओंची चौकशी व्हायलाच हवी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जळगावमध्ये माघार घेण्यास नकार दिल्यामुळे उमेदवारांचे अपहरण करून त्यांना जबरदस्तीने अर्ज मागे घ्यायला लावल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या निवडणुकांमध्ये बिनविरोध विजय मिळवण्यासाठी धमक्या, पैशांचा वापर, ब्लॅकमेलिंग आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे राऊत म्हणाले.

या सगळ्या प्रकारांवर राज्याचे मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोग गप्प का आहेत, असा संतप्त सवाल करत कल्याण-डोंबिवलीमध्ये बिनविरोध निवडीनंतर काढल्या जाणाऱ्या विजयी मिरवणुकांवरही त्यांनी टीका केली. ही महापालिका कुणाच्या खासगी मालकीची आहे का, असा जहरी सवाल करत राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ