spot_img

Sanjay Raut on MNS Shinde Shivsena Alliance : शिंदेसोबत कधीच जाणार नाही, केडीएमसीतील मनसे–शिंदेसेना युतीवर संजय राऊतांचा प्रखर हल्ला

spot_img

राज–उद्धव गोटात खळबळ; अस्थिरतेत भाजपसोबत चर्चा शक्य, पण शिंदेसेनेला ठाम नकार

कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातमिळवणी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही गोटांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून या प्रकरणावर जोरदार भाष्य केलं.

राऊत यांनी केडीएमसीतील मनसे–शिंदेसेना युतीवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितलं की, शह-कटशहाच्या राजकारणात नीतीमत्ता वाहून जाऊ नये. जिथे परिस्थिती अत्यंत अस्थिर असेल, तिथे प्रसंगी भाजपसोबत चर्चा होऊ शकते, पण शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, केडीएमसीतील हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला असून, तो मनसेची अधिकृत भूमिका नाही. राज ठाकरे यांनाही ही युती मान्य नसल्याचं त्यांनी सूचक विधान केलं. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी अंतर्गत चर्चा केली जाईल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. स्थानिक नेत्यांना युती करायचीच होती, तरी ती शिंदेसेनेसोबत करू नये, असं मतही त्यांनी ठामपणे मांडलं.

शिंदेसेना आणि भाजप हे एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करू शकतात, त्यामध्ये इतर पक्षांनी सहभागी होण्याचं काहीच कारण नव्हतं, असं राऊत म्हणाले. शिंदेंच्या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट, कडवट आणि कठोर आहे, असं सांगत त्यांनी कोणतीही दुमताची जागा ठेवली नाही.

दरम्यान, केडीएमसीमध्ये शिंदेसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काही नगरसेवकांकडून मातोश्रीवर देण्यात आला होता का, या प्रश्नावरही राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. अशा प्रस्तावांना आम्ही थेट केराची टोपली दाखवतो, असं स्पष्ट करत त्यांनी पक्षाची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. परस्पर निर्णय घेण्यास कुणालाही मुभा नाही; अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

आज महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर होत असताना, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे आगामी राजकीय घडामोडींवर साऱ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ