नवी मुंबई आणि वसई-विरारमधील हिंदी प्रचारावरून शिवसेना नेत्यांची भाजप व मुख्यमंत्र्यांवर कडवी टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाषेच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सक्तीबाबत भाजपाकडून दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री जाहीरपणे सांगतात की महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील. पण प्रत्यक्षात भाजपाच्या जाहिरनाम्यात नवी मुंबईत हिंदी सक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. नवी मुंबईची ओळख मराठी भाषेनेच झाली आहे. हे शहर मराठी, आग्री आणि कोळी समाजाने उभं केलं आहे. मग इथली भाषा मराठी नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नवी मुंबईतील स्थानिक नेत्यांची नावे घेत राऊत म्हणाले की, “गणेश नाईक, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर हे सगळे याच भागातले आहेत. आमचे आमदार असोत किंवा नसोत, तो परिसर मराठीच आहे. बाहेरून आलेले लोक कामधंद्यासाठी येथे राहतात. पण मुख्यमंत्र्यांनाच जर मराठी भाषेबद्दल आपुलकी नसेल, तर त्यांनी हिंदीप्रेमासाठी उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशात निवडणूक लढवावी,” अशी टीकाही त्यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी वसई–विरारचा मुद्दा उपस्थित केला. “चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वसई-विरारमध्ये प्रचारासाठी गेले होते आणि संपूर्ण भाषण हिंदीत केलं. वसई-विरारची भाषा कधीपासून हिंदी झाली? तो संपूर्ण भाग मराठी आहे. तिथे इतर भाषिक लोक असतील, पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी भूमीत उभं राहून हिंदी लादतो, हे धक्कादायक आहे,” असं राऊत म्हणाले.
“चिमाजी आप्पांची ही भूमी आहे. किमान त्या इतिहासाचा तरी सन्मान ठेवायला हवा. पण नवी मुंबईत हिंदी सक्ती आणि वसई-विरारमध्ये हिंदी भाषण करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा कट सुरू आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यावेळी भाजप नेते अण्णामलाई यांच्या विधानावरही संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. “माझ्या तोंडावर बॉम्बे बसलं, असं तो म्हणतो. तर मग त्याने चेन्नईला जावं. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणालाही नाही. भाजपाचे नेते बाहेरून येऊन वाद निर्माण करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांना पाठबळ देतात,” असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला. या वक्तव्यांमुळे राज्यातील भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगलाच तापला आहे.




