फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या, मुंबईतील तरुणीची हत्या; गृहखात्याच्या कारभारावर संजय राऊतांचा घणाघात
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत चालली असून, यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. फलटण येथे सरकारी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या घटनेत पोलिसांवरच आरोप आहेत, तर मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीवर भरदिवसा चाकूहल्ला करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्लेखोरानेही नंतर आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
राऊत यांनी गृहखात्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फडणवीस यांचं लक्ष कायदा-सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेकडे नसून, विरोधकांवर कारवाई आणि पोलिसांचा गैरवापर यावरच केंद्रित आहे, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “गृहखातं अजगरासारखं निपचित पडलं आहे. पोलिसांना विरोधकांचे फोन टॅप करणं, त्यांच्यावर पाळत ठेवणं यासाठीच वापरलं जात आहे. पोलिस खातं हे सत्ताधारी पक्षाचा चाकर बनलं आहे.” राज्यातील पोलिस महासंचालक एक महिला असूनही महिलांच्या सुरक्षिततेची परिस्थिती चिंताजनक आहे, असं राऊत यांनी नमूद केलं. “ज्या महिला आमदार सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर आंदोलन करायच्या, त्या आता का गप्प आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील हे गंभीर चित्र दाखवतं की, सरकार प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलं आहे. राऊत यांच्या मते, “राज्यातलं सरकार हे सरकारसारखं काम करत नाही. गृहखात्याचा कारभार असंवेदनशील आणि निष्क्रिय बनला आहे.” या घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती आणि गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.




