लोकशाही नव्हे तर सत्ता–पैशांचा खेळ; मुंबई अदानींच्या हाती देण्याचा कट असल्याचा ठाकरे गटाचा आरोप
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने सत्ताधारी महायुती आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून या निवडणुका लोकशाही पद्धतीने न होता सत्ता, पैसा आणि यंत्रणांच्या गैरवापरातून पार पडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेषतः मुंबईवर ताबा मिळवून ती अदानी समूहाच्या हवाली करण्यासाठीच हे संपूर्ण राजकीय षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती आणि आतापर्यंत २३ महापौर शिवसेनेने दिले. हे सर्व महापौर मराठी अस्मितेचे प्रतिनिधित्व करणारे होते. मात्र यावेळी लागलेले निकाल पाहता ही परंपरा कायम राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी माणसाचा आणि मराठी अस्मितेचा पराभव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार आणि अमित साटम यांच्यामुळेच झाला, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना उघडपणे साथ दिल्यामुळे या निवडणुका झाल्या की आयोगाने नेमणुका केल्या, असा बोचरा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
भाजप राज्यात लहर असल्याचा दावा करत असले तरी ती लहर नसून सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा कहर असल्याचे सामनात नमूद करण्यात आले आहे. मुंबई जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कोणतेही नैतिक बंधन पाळले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. मराठीबहुल भागांमध्ये मतदारांची नावे याद्यांतून वगळली गेली, बोटावरील शाई पुसता येईल अशी व्यवस्था करण्यात आली, इतकेच नव्हे तर मंत्री गणेश नाईक यांचेही नाव मतदार यादीतून गायब होते, अशा अनेक घटनांचा उल्लेख अग्रलेखात आहे. या सगळ्या अडथळ्यांनंतरही मतदारांनी आपले कर्तव्य बजावल्याचे सामनात नमूद करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले सुमारे ४० हजार कोटींचे प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित कमिशनखोरीमुळे रद्द केल्याचा उल्लेख करत, शिंदे गटातील भ्रष्टाचार आणि पैशांची हवस किती टोकाची आहे, हे फडणवीसांनीच उघड केले, असा दावा करण्यात आला आहे.
अदानी समूहावरही अग्रलेखातून जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत अदानींच्या साम्राज्याचे सादरीकरण केल्यानंतर देश हादरल्याचे सामनात नमूद आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अदानींच्या वाढत्या प्रभावावर सातत्याने बोट ठेवले असून, मागील दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळेच अदानींचे साम्राज्य उभे राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विमानतळे, बंदरे आणि सार्वजनिक उद्योग ताब्यात घेण्यासाठी दबाव आणि सत्तेचा वापर करण्यात आल्याचा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
धारावी आणि मुंबईतील मोक्याच्या जमिनी अदानींच्या घशात घालण्यासाठीच महाविकास आघाडी फोडली गेली, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीसमोर स्वाभिमान गहाण ठेवून मुंबईत अदानींचा पाया मजबूत केला, अशी टीकाही करण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९९९ मधील १०० कोटींच्या सिंचन घोटाळ्याची फाईल उघड करून भाजपचा खरा चेहरा समोर आणल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपने माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, पण आज मी त्यांच्याच सरकारमध्ये आहे, या अजित पवारांच्या विधानातून मोदी आणि फडणवीस यांचा दुटप्पीपणा उघडा पडतो, असे सामनात म्हटले आहे.
शेवटी, मुंबईच्या रक्षणासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिलेल्या लढ्याचा इतिहास नव्याने लिहिला जाईल. निवडणुका संपल्या असल्या तरी खरा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा ‘सामना’ अग्रलेखातून देण्यात आला आहे.




