महापालिका निकालांनंतर शिंदे-भाजपवर जोरदार टीका, मनसेसोबतच्या युतीबाबतही राऊतांची स्पष्ट भूमिका
राज्यातील 29 महापालिकांच्या निकालांमध्ये भाजपने बहुतेक ठिकाणी वर्चस्व मिळवत विजयाची पताका फडकावली आहे. सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबई महापालिकेतही भाजप-शिंदे गटाची युती सत्तेच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता उलथवली गेल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
या निकालांनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना आक्रमक भूमिका घेतली. “आमच्याकडे सत्ता आणि अमाप पैसा असता, तर भाजपलाही देश सांभाळता आला नसता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावर टिकले नसते आणि एकनाथ शिंदे यांचं पदही वाचलं नसतं,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप करताना सांगितलं की, शिवसेनेचे 60 नगरसेवक फोडण्यात आले, मात्र त्यापैकी सुमारे 90 टक्के उमेदवारांचा पराभव झाला. ठाकरे गट आणि मनसे मिळून 71 जागा जिंकण्यात यशस्वी ठरले असून, प्रतिकूल परिस्थितीतही मराठी मतदार आमच्या पाठीशी ठाम उभे राहिले असल्याचं त्यांनी नमूद केलं.
एकनाथ शिंदेंवर टीका करताना राऊत म्हणाले की, “जर शिंदे गद्दार ठरले नसते, तर भाजपच्या कितीही पिढ्या आल्या असत्या तरी मुंबईवर भाजपचा महापौर बसू शकला नसता.” त्यांनी यावेळी ऐतिहासिक संदर्भ देत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
मनसेच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, “हा पराभव आम्ही मानत नाही. आम्ही चांगली लढत दिली आहे. मनसेला आणखी 10 ते 12 जागा मिळायला हव्या होत्या. काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले. आम्ही मनसेच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केले, मात्र अपेक्षित निकाल मिळाला नाही. याबाबत दोन्ही पक्ष एकत्र चर्चा करतील.”
तसेच फडणवीसांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांनी फडणवीसांवर टीका करत “ते नेहमी पक्षांमध्ये भांडणं लावण्याचं काम करतात” असंही म्हटलं.
मुंबईत शिवसेनेची पारंपरिक ताकद होती आणि याआधी 84 नगरसेवक निवडून आले होते, मात्र यावेळी आकडे कमी झाले असल्याचं मान्य करत राऊत म्हणाले की, निवडणुकांमध्ये चढ-उतार होतच असतात. ठाण्यातही भाजप मजबूत होती, पण तिथे शिंदे गट पुढे गेला, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. महापालिका निकालांनंतर ठाकरे गट आणि मनसेची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




