spot_img

Sanjay Raut : तब्येतीत सुधारणा होतेय पण… संजय राऊत म्हणाले

spot_img

‘उपचार कठीण, पण डिसेंबरनंतर पूर्ण बरा होईन’; शिंदे गटावर पैशांच्या खेळावर गंभीर आरोप

शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या महिनाभरापासून तब्येत ठीक नसल्यामुळे सार्वजनिक आयुष्यातून दूर होते. मात्र आज त्यांनी माध्यमांसमोर हजेरी लावत तब्येतीची माहिती दिली आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणे राजकीय मुद्द्यांवर जोरदार फटकेही दिले.

राऊत म्हणाले की, “माझ्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. तब्येतीत हळूहळू सुधारणा होते आहे, पण पूर्णपणे सावरायला थोडा वेळ लागेल. गेल्या महिनाभरापासून घर आणि हॉस्पिटलमध्येच कैद झालो आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माझी प्रकृतीवर सतत नजर ठेवून आहेत. त्यांची परवानगी नसताना मी बाहेर पडू शकत नाही. पण आज आपण सगळे भेटायला आलात, हे ही औषधासारखंच आहे.”

ते पुढे म्हणाले, “उपचार खूप कठोर असतात. आजारापेक्षा उपचार जास्त त्रासदायक वाटतात. तरीही डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे की डिसेंबरनंतर मी पुन्हा जोमाने कामाला लागेन. रेडिएशनचा मुख्य टप्पा संपला असून उर्वरित उपचार सुरू आहेत. मी पूर्ण बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीत मी आधीच महाराष्ट्रभर फिरलो असतो.”

यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवरही निशाणा साधला. “शिंदे गटाच्या नेत्यांनी ‘लक्ष्मी दर्शन’ ची घोषणा करून निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस पाडला आहे. काही ठिकाणी मतामागे दहा-पंधरा हजार रुपये दिल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एवढा पैसा खेळताना कधीच दिसला नव्हता,” अशी टीका राऊतांनी केली.

ते पुढे म्हणाले, “नगरपालिका निवडणुका पूर्वी स्थानिक पातळीवर लढवल्या जायच्या. पण आता 5-6 हेलिकॉप्टर, खाजगी विमानांचा वापर करून सत्तारूढ पक्ष निवडणुका लढवत आहेत. इतके कोट्यवधी रुपये खर्च करून कोणासाठी लढाई सुरू आहे? शिंदे गटाची शिवसेना खरंतर अमित शाह यांनी निर्माण केलेली आहे. त्यांचा कोथळा पण तेच काढतील. शिंदे गटात मोठी फूट पडणार हे लिहून ठेवा.” पैशांच्या जोरावर निवडणुका लढवणे म्हणजे लोकशाही नसल्याचा आरोप करत राऊतांनी शिंदे गट आणि भाजप यांना थेट लक्ष्य केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ