spot_img

Sanjay Raut : पाटण्यात महाराष्ट्र भवनसाठी जमीन द्या, नाहीतर बाजारभावाने जागा घ्या, राऊतांचा स्पष्ट इशारा

spot_img

मुंबईतील ‘बिहार भवन’वरून राजकीय रणधुमाळी; संजय राऊतांची बिहार सरकारला थेट अट

मुंबईत ३० मजली बिहार भवन उभारण्याच्या प्रस्तावावरून महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यामुळे वातावरण तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार देते, याची आम्हालाही पूर्ण जाणीव आहे. मात्र बिहारच्या मंत्र्यांनी वापरलेली भाषा संयमित आणि सुसंस्कृत असायला हवी होती. मुंबईत आधीच अनेक राज्यांची भवने आहेत, पण आव्हानाच्या सुरात बोलणे योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राऊत यांनी बिहार सरकारसमोर एक स्पष्ट अट मांडली आहे. जर मुंबईत बिहार भवन उभारायचे असेल, तर त्यासाठी मुंबईतीलच जमीन वापरावी लागेल. त्याचबरोबर, ज्या पद्धतीने बिहार सरकार मुंबईत जागेची मागणी करत आहे, त्याच धर्तीवर पाटण्यात महाराष्ट्रासाठी ५ ते ६ एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. गोला रोड किंवा न्यू पाटलीपुत्र कॉलनीसारख्या मोक्याच्या भागात महाराष्ट्र भवन उभारण्याची संधी द्यावी, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र आणि बिहार यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायला हवी, असे मत व्यक्त करत राऊत म्हणाले की, जर बिहारी बांधव मुंबईत येऊन राहू शकतात, तर मराठी बांधवांनाही पाटण्यात तशीच संधी मिळाली पाहिजे. ही देवाणघेवाण केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता देशभर स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील जमिनीच्या टंचाईकडे लक्ष वेधत संजय राऊत म्हणाले की, जर बिहार सरकारला जागा हवी असेल, तर ती बाजारभावाने घ्यावी. सवलतीत किंवा मोफत जागा हवी असेल, तर त्याच्या बदल्यात पाटण्यात महाराष्ट्राला समतोल जागा द्यावी. विनाकारण मुंबईतील वातावरण बिघडवणारी वक्तव्ये करू नयेत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ